राज्यातील कथित स्टिंग ऑपरेशन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आणि भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सरकारसह स्वपक्षातील नेत्यांवर टीका केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या सक्रिय असल्याचा दावा यत्नाळ यांनी केला. यापैकी एका कंपनीला भाजपच्या एका नेत्याच्या धाकट्या मुलाचे मार्गदर्शन, तर दुसऱ्या कंपनीला राज्यातील मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित दोघांची नार्को चाचणी केल्यास सत्य बाहेर येईल. सिद्धरामय्या यांची कथित सीडी पक्षश्रेष्ठींना दाखवून त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कट रचल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजल्याचे यत्नाळ म्हणाले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावरही त्यांनी टीका केली. समिती स्थापन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने साखरेचा किमान दर प्रतिकिलो ५५ रुपये निश्चित केल्यास कारखाने उसाला प्रतिटन चार हजार रुपये देण्यास तयार होतील. रेशनवर तांदळासोबत साखरेचे वितरण करावे आणि शेतकऱ्यांवरील कर माफ करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा. तसेच आगामी दहा वर्षे आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्याचे लेखी द्यावे, अशी मागणी यत्नाळ यांनी केली. विजयेंद्र यांच्या वडिलांनी अलीकडेच एच. डी. देवेगौडा यांची भेट घेऊन मुलाचे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवण्याची विनंती केल्याचा दावाही त्यांनी केला. या घडामोडींमुळे पक्षात नाराजी असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारने केलेल्या दूधदरवाढीचे स्वागत करताना वाढीव आठ रुपये संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत, ते केएमएफला देऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. केएमएफमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून, सरकारच्या हजारो कोटी रुपयांच्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्राहकांना दर्जेदार दूध मिळण्यासाठी दरवाढीचा लाभ थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यत्नाळ यांनी सांगितले.


Recent Comments