कर्नाटक बंदच्या आवाहनाला विजापूर जिल्ह्यातही प्रतिसाद मिळत असून, ऊसदराच्या मागणीसाठी विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.
चडचण तालुक्यातील तद्देवाड येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा दिला. दुकाने बंद ठेवून त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ दिली. चडचण, इंडी आणि परिसरातील गावांतील शेतकरी जळकी क्रॉस येथे मोठ्या संख्येने जमले होते. आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी शेतकरी नेत्यांनी केले. मुद्देबिहाळमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बसगाड्या आगारातच थांबविण्यात आल्या असून, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको, धरणे, मिरवणुका आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आंदोलनांवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. टोल नाक्यांचे प्रवेश आणि निर्गमन मार्ग बंद करू नयेत तसेच टोल कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांनंतरही आंदोलन मागे घेण्याची शेतकरी संघटनांची तयारी नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१ सह प्रमुख महामार्गांवर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. हिटणळ्ळी टोल नाक्याजवळ बेंगळुरू-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ऊसदराच्या मागणीवरून राज्य सरकार आणि साखर कारखानदारांसोबत झालेल्या चर्चेत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. कारखान्यांकडून प्रति टन उसाला ४,५०० रुपये आणि राज्य सरकारकडून १,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान, असे एकूण ५,५०० रुपये मिळावेत, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
एकीकडे ऊसदरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने निषेधाज्ञा लागू केली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा मिळाला असून, मुद्देबिहाळमध्ये बससेवा बंद ठेवण्यासह दुकानेही बंद करण्यात आली आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ऊसदराच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन राज्यव्यापी बंदचे स्वरूप घेत असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.


Recent Comments