Vijayapura

ऊसदराच्या मागणीसाठी विजापूर जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांच्या गोदामांना टाळे

Share

विजापूर जिल्ह्यात ऊसदरासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आणि हरित सेनेने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांच्या गोदामांना टाळे ठोकत मागण्या मान्य न झाल्यास साखर विक्री रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ६० रुपये करावी, घरगुती वापराच्या साखरेचा दर ६० रुपये आणि अन्य वापराच्या साखरेचा दर १०० रुपये निश्चित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखान्यांमध्ये उत्पादित होणारे संपूर्ण इथेनॉल खरेदी करण्याची व्यवस्थाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे राज्य गौरवाध्यक्ष शशिकांत गुरूजी आणि प्रदेशाध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली. कारजोळ, आलमेल आणि चडचणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी साखर गोदामांना टाळे ठोकले. ऊसदर निश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बंगळुरूमध्ये होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास राज्यात उत्पादित होणाऱ्या साखरेची बाजारात विक्री होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. हे आंदोलन केवळ विजापूर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यातील ८१ साखर कारखान्यांमध्येही अशाच प्रकारचे आंदोलन सुरू असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ऊसदरासह विविध मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर

Tags: