आपल्या लाडक्या मुलाच्या हत्येमुळे तीव्र आघात आणि अतीव दुःखाच्या छायेत वावरत असलेल्या अगरवाल कुटुंबाने श्री तुळजाभवानी मातेच्या भक्तसेवेची पवित्र परंपरा अविरत ठेवत अद्वितीय मानवकल्याण दर्शवले आहे.

आश्विन पौर्णिमेच्या पावन यात्रेनिमित्त अन्नछत्र सुरू करून या कुटुंबियांनी ‘जस्टिस फॉर केतन’ या प्रभावी संदेशाद्वारे आपल्या मुलासाठी न्याय मिळवण्याची साद संपूर्ण समाजाला घातली आहे.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी दादा किसनलाल अगरवाल यांनी रोवलेले या अन्नदसोहाचे रोपटे नंतर दिवंगत देवीचंद अगरवाल यांनी जोपासले. आता कुटुंबातील सुपुत्रांनी ही परंपरा अत्यंत निष्ठेने पुढे चालवली आहे. यात्रेसाठी लोटणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादासाठी पंचपक्वान्न आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेता निर्धारित वेळेपूर्वीच अन्नछत्राचे द्वार उघडण्यात आले असून, यात्रेच्या संपूर्ण कालावधीत सुमारे पन्नास हजार ते एक लाख भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. केतनच्या हत्येच्या भीषण आघात सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही निधन झाले असल्याची माहिती शोकाकुल कुटुंबियांनी दिली आहे. अशा दुःखाच्या प्रसंगातही लोकसेवेचा वसा न सोडता केतनला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या कुटुंबाचे कार्य साऱ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारे ठरत आहे.


Recent Comments