Vijayapura

तुळजापूरच्या दिशेने भाविकांचा अथांग जनसागर

Share

कडक ऊन आणि लांबलचक महामार्ग असा कठीण प्रवास करत हातात भगवे ध्वज घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाच्या ओढीने लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

विजापूर, बेळगावसह कर्नाटकातील विविध भागांतून बालकांपासून ते वृद्धांपर्यंत हजारो भाविक या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. ‘आई राजा उदे उदे’ आणि ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या जयघोषात भाविक आपला भक्तिभाव व्यक्त करत आहेत. पदयात्रेत ढोल-ताशांचा गजर आणि भगव्या पताकांनी अवघा मार्ग भक्तिमय झाला आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे धाराशिव जिल्हा प्रशासनाने चार दिवस महामार्गावरील वाहतुकीत बदल केले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विविध संस्थांकडून पदयात्रेच्या मार्गावर महाप्रसाद, पाणी, वैद्यकीय सुविधा आणि फळांचे वाटप केले जात आहे.

तुळजाभवानीवरील ही श्रद्धा केवळ सामान्य जनतेपुरती मर्यादित नसून धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण कार्तीक पुजारी यांनीही आपल्या पत्नीसह पदयात्रा करत देवीचे दर्शन घेतले आणि नवस फेडला. रविवारी एकाच दिवसात १० लाखांहून अधिक भाविकांनी तुळजापूर शहरात हजेरी लावल्याचा अंदाज आहे. देवीच्या अभिषेकात सहभागी झाल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. भाविकांनी रात्री जागरण, विशेष पूजा आणि धार्मिक विधींमध्ये उत्साहाने भाग घेतला. मिरवणुकीद्वारे देवीची मूर्ती सिंहासनावर विराजमान करण्याचा सोहळा भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला.

अनेक किलोमीटर चालल्याने पाय थकले तरी भाविकांची श्रद्धा डगमगली नाही. उन्हाची तमा न बाळगता तुळजाभवानीच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्येक पाऊल पुढे पडत आहे. कुटुंबाचे रक्षण व्हावे आणि आयुष्यात शांती-समृद्धी लाभावी, या प्रार्थनेसह लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

विजयकुमार सारवाड

इन न्यूज

विजापूर

Tags: