कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स साखर कारखाना उभारण्यासाठी आपली जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत कायम करण्याचे दिलेले आश्वासन व्यवस्थापनाने फेटाळल्यामुळे, सुमारे २० कामगारांनी कारखान्यासमोर उपोषण आणि संप सुरू केला आहे.
सोमवारी सकाळपासूनच साखर कारखान्यासमोर हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, आंदोलनकर्ते सुमित कांबळे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. गावामध्ये साखर कारखाना सुरू होत आहे हे लक्षात घेऊन आमच्या पूर्वजांनी कसली जात असलेली सुमारे ४३ एकर जमीन कारखान्यासाठी दिली होती, असे त्यांनी सांगितले.

१९९३ मध्ये जमीन खरेदी करताना साखर कारखान्याचे मालक के. पी. मग्गेनावर यांनी ‘तुमच्या मुलांना कारखान्यात कामगार म्हणून सामावून घेऊन त्यांची सेवा कायम केली जाईल’ असे आश्वासन दिले होते. मात्र सुमारे ३३ वर्षे उलटूनही २० कामगारांना कायम न करता अद्यापही कंत्राटी तत्त्वावरच ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तात्काळ आमची सेवा कायम करून आदेश पत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याच मागण्यांसाठी २०२० मध्येही आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेवा कायम करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा फसवणूक करण्यात आली, म्हणूनच आता पुन्हा उपोषण सुरू केल्याचे कामगारांनी सांगितले.
या आंदोलनात सुमित कांबळे, प्रशांत कांबळे, पिंटू देवने, अस्लम सारवान, राजू धोंडरे, अरुण भजंत्री, प्रेमकुमार चव्हाण, सागर साने यांच्यासह अनेक कामगार उपोषण सत्यग्रहात सहभागी झाले आहेत.


Recent Comments