ऐतिहासिक कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने जलसाहस क्रीडा आणि नौकाविहाराचा शानदार प्रारंभ करण्यात आला असून, यामुळे महोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, बैलोहंगलचे आमदार महांतेश कौजलगी आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जलक्रीडा व नौकाविहाराचे उद्घाटन झाले.
मान्यवरांनी कित्तूर येथील ऐतिहासिक तलावात नौकाविहाराचा आनंदही घेतला. याप्रसंगी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी उत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येत या उपक्रमांना सुरुवात केल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही कित्तूर उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, सायंकाळी मंत्री व मुख्यमंत्र्यांचे आगमन अपेक्षित आहे. विक्री दालने, नौकाविहार आणि गुरांची जत्रा यांसारख्या विविध उपक्रमांना प्रारंभ झाला आहे. कित्तूर प्राधिकरणासह क्षेत्राच्या विकासासाठी अधिक निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

वीरराणी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळायला हवी, अशी सर्वांचीच तीव्र इच्छा असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

या दृष्टीने राज्य सरकारच्या स्तरावरील आवश्यक प्रक्रिया व कागदपत्रे पूर्ण करण्यात आली आहेत. आता केंद्र सरकारसह खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, जगदिश शेट्टर व प्रल्हाद जोशी यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
उत्तर भारतातील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच कित्तूर राणी चन्नम्मा यांनाही राष्ट्रीय स्तरावर यथोचित सन्मान मिळायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले.


Recent Comments