वीर राणी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या भूमीत २३, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी २०२ वा कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जाणार असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.

उत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी क्रांतीज्योतीचे आगमन होऊन उत्सवाचे उद्घाटन होईल, तर शेवटच्या दिवशी होणाऱ्या समारोप सोहळ्याला सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. कित्तूरचा ऐतिहासिक वारसा राज्यभरात पोहचवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.


या वर्षीच्या उत्सवात क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फळ-पुष्प प्रदर्शनासोबतच नव्याने जनावरांच्या जत्रेचा समावेश करण्यात आला आहे. दुग्ध व्यवसाय आणि स्थानिक गुरांच्या पैदाशीला प्रोत्साहन देण्यासाठी देशी व संकरित जनावरांच्या स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. हरियाणासह इतर राज्यांतूनही प्रसिद्ध जातीच्या म्हशी व गुरे आणण्याची सोय करण्यात आली असून पशुपालकांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.
गेल्या वर्षीच्या चुका दुरुस्त करून यंदा अधिक नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन हा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण संस्कृतीला व्यासपीठ मिळवून देणारा हा उत्सव नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.


Recent Comments