उसाला योग्य दर आणि सर्व पिकांना हमीभाव वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन ६ व्या दिवशीही सुरूच आहे.
राणी चन्नम्मा चौकात एकत्र आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या राणी चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांचे नेते आणि स्थानिक शेतकरी केंद्र व राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आंदोलनस्थळी सरकारांच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात सातत्याने घोषणाबाजी सुरू असून, शहरात आंदोलनाची झळ वाढली आहे.
विशेषतः उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर निश्चित करावा आणि सर्व पिकांचा किमान हमीभाव तात्काळ वाढवावा, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडून मिळणाऱ्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांचे संकट सुटलेले नाही. त्यामुळे पूर्ण तोडगा निघेपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. सरकारने तात्काळ लक्ष घालून मागण्या पूर्ण न केल्यास आगामी काळात राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे.


Recent Comments