Belagavi

बेळगावात आठव्या दिवशी ‘दुर्गामाता दौड’ मोठ्या उत्साहात

Share

बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असलेली ‘दुर्गामाता दौड’ रविवारी आठव्या दिवशी उत्साहात पार पडली. शहापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात पूजा आणि आरती करून या दौडला प्रारंभ करण्यात आला.

बेळगाव शहरात रविवारी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये नवदुर्गांचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले.

शहापूर येथील नाथ पै चौकातील श्री अंबाबाई मंदिरातून या दौडला सुरुवात झाली. मंदिरात महाआरती आणि ध्वजारोहण करून दौड मार्गस्थ झाली. दौडच्या संपूर्ण मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. ठिकठिकाणी नागरिकांनी दौडचे भव्य आणि जल्लोषात स्वागत केले.

ही दौड शहापुरातील महात्मा फुले मार्ग, लक्ष्मी मार्ग, कारभार गल्ली, गणेशपूर गल्ली, बसवेश्वर चौक, मारुती गल्ली आणि संभाजी रोडवरून मार्गस्थ झाली. दौडमध्ये बालचमूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध देवदेवतांची वेशभूषा साकारली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तसेच मीरापूर गल्लीतही दुर्गामाता दौड पार पडली, जिथे नवदुर्गांच्या नऊ रूपांचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी पताका आणि सजावटीने रस्ते सुशोभित केले होते. खडेबाजार, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, आचार्य गल्ली आणि पी. बी. रोडमार्गे जाऊन होसूर बसवाण गल्ली येथे आजच्या दौडीची सांगता झाली.

सोमवारी तहसीलदार गल्ली येथून दौड सुरु होईल. त्यानंतरविविध मार्गांवरून मार्गस्थ होत पाटील गल्लीतील श्री शनी मंदिरात सांगता होईल.

Tags: