ज्येष्ठ नागरिकांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने संजीविनी फाउंडेशनतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिक पुरस्कार वितरण सोहळा जी. जी. चिटणीस स्कूल येथे उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे शिरीष गोगटे, सुनीलकुमार आपटेकर आणि दीपक पवार यांना ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अॅड. चंद्रहास अणवेकर, संजीविनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सविता देगीनाळ यांच्या प्रास्ताविक व स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी ज्येष्ठ नागरिक पुरस्काराची संकल्पना, त्यामागील उद्देश तसेच संजीविनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आणि योगदानाचा समाजाने सन्मान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर शिरीष गोगटे, सुनीलकुमार आपटेकर आणि दीपक पवार यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना शिरीष गोगटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, “लहानपणी आपण कसे होतो आणि बघता बघता आयुष्याचा प्रवास करत ज्येष्ठ नागरिक झालो,” यावर मार्मिकपणे विचार व्यक्त केले. काळ कसा बदलतो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचे महत्त्व काय असते, याबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केले.
शरीरसौष्ठवपटू सुनीलकुमार आपटेकर यांनी संजीविनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना, “संजीविनी फाउंडेशन पृथ्वीवर देवाने पाठवलेल्या देवदूतांप्रमाणे काम करत आहे,” असे गौरवोद्गार काढले. आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष सांगताना त्यांनी लहानपणी छातीची मापे कमी असल्याने एअर फोर्समध्ये निवड होऊ शकली नाही, असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःवर कठोर मेहनत घेतली आणि शरीरसौष्ठव क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. पुढे भारतातील सर्वाधिक छातीचे माप असलेला शरीरसौष्ठवपटू होण्याचा मान मिळवून तीन वेळा ‘मिस्टर इंडिया’ किताब पटकावल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीसमोर हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
दीपक पवार यांनी आपल्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याचा प्रवास सांगताना त्यांच्या प्रयत्नांतून ऑटो नगर कसे उभे राहिले आणि क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीत कशा प्रकारे योगदान दिले, याची माहिती दिली. संजीविनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून संस्थेला भविष्यात स्वतःची वास्तू असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. संजीविनीच्या या कार्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रमुख पाहुणे अॅड. चंद्रहास अणवेकर यांनीही ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आणि समाजातील योगदानाचा गौरव करत संजीविनी फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक केले.
पाहुण्यांचा परिचय अंकिता सूर्यवंशी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसी थॉमस यांनी केले, तर आभार पद्मा औषेकर यांनी मानले.
ज्येष्ठांचा सन्मान, त्यांच्या अनुभवाचा गौरव आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्याचे संजीविनी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी सल्लागार सदस्या डॉ नवीना शेट्टीगार, रेखा बामणे, विद्या सरनोबत, संजय पाटील,प्रीती चौगुले,सरिता सिद्दी, कावेरी लमानी,अर्चना शिरहट्टी,जीवन कदम तसेच निमंत्रित मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Recent Comments