Belagavi

वॉर्ड ५३ मध्ये उद्यान विकासाच्या कामावरून वाद; नगरसेवकाला स्थानिकांनी रोखले

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५३ मधील वृंदावन कॉलनी येथील उद्यानात सुरू असलेले विकासकाम अनधिकृत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि नगरसेवक श्रीशैल कांबळे यांना जाब विचारत काम रोखून धरले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना शांत केले.

स्थानिकांच्या आरोपांना उत्तर देताना नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी स्पष्ट केले की, हे काम महानगरपालिकेच्या निधीतून व नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका महासभेत मंजुरी घेऊनच हाती घेण्यात आले आहे.

उद्यानात सावलीची सोय, शेड, ओपन जिम, बसण्यासाठी बाकडी, वॉकिंग ट्रॅक आणि वाचनाची सोय करण्यासाठी हे काम केले जात आहे. काम अंतिम टप्प्यात आले असताना काही कुटुंबे विनाकारण विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर गार्डनच्या मोकळ्या जागेत मनपाकडून बेकायदेशीर शेड आणि आरसीसी स्टेजबद्दल स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले. बुडाच्या मंजूर लेआउट नियमांनुसार ही जागा उद्यान व रस्त्यासाठी राखीव असताना पार्क कायद्याचे उल्लंघन करून वर्क ऑर्डर देण्यात आल्याचा आरोप करत, आदेशानंतरही पालिका आयुक्त कारवाई करत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

तसेच, शेडच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम केले जात असून विरोध करणाऱ्या नागरिकांना त्रास दिला जात आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या पत्रानंतरही बेकायदेशीर कॉलम न हटवल्यामुळे, ही मोकळी जागा पूर्ववत न केल्यास उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात रिट याचिका दाखल करण्याचा इशारा अक्षय जक्कनवर, राजेंद्र जक्कनवर व लक्ष्मण सावंत यांच्यासह स्थानिकांनी दिला आहे.

Tags: