समाज भरकटत चाललेल्या या काळात जल, जमीन आणि जंगल रक्षणासाठी आयुष्यभर धडपडणाऱ्या डॉ. शिवाजीराव कागणीकर यांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.

राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी (बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘सर्वोदयाचा वाटसरू’ या ग्रंथाच्या मराठी व कन्नड आवृत्तीचा लोकार्पण सोहळा बेळगावातील गोखले रंगमंदिर येथे पार पडला.


या वेळी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, आजच्या उपभोगवादी आणि भांडवलशाही व्यवस्थेत शोषितांचे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत ग्रामीण जीवन, शेती आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी कागणीकर यांनी केलेली निःस्वार्थ सेवा समाजासाठी आदर्श आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. शिवाजीराव कागणीकर म्हणाले की, अत्यंत गरीब कुटुंबातून आल्याने लहानपणी पाटी-पेन्सिलही नव्हती. मात्र साने गुरुजी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले.

लाखो झाडे लावणे, हजारो गोबर गॅस संयंत्रे उभारणे आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची प्रेरणा या महापुरुषांच्या विचारांतूनच मिळाली, असे कागणीकर यांनी सांगितले. लवकरच या ग्रंथाची इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.



Recent Comments