केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या आरोपांना कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपण सर्व मालमत्ता कायदेशीर मार्गानेच मिळवली असून त्याची संपूर्ण माहिती प्राप्तीकर विभागाकडे जमा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या बाजारभावानुसार माझ्याकडे १,४०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. ही सर्व संपत्ती नियमांच्या चौकटीत राहूनच कमावलेली आहे. भाजप आणि जेडीएस युतीमधील अंतर्गत स्पर्धा आणि अपयशामुळेच कुमारस्वामी हताश होऊन असे आरोप करत असल्याचे शिवकुमार म्हणाले. या प्रकल्पावर देवेगौडा यांनी स्वाक्षरी केली होती आणि कुमारस्वामी स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा आठवही त्यांनी करून दिला.

कुमारस्वामी हे काही प्राप्तीकर विभागाचे अधिकारी नाहीत असे सांगत शिवकुमार यांनी त्यांना आव्हान दिले. एक व्यावसायिक आणि शेतकरी म्हणून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कायदेशीर मार्गाने मालमत्ता घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. नाईस रस्ता प्रकल्प आणि बिडदी टाउनशिपमध्ये कोणाकोणाची मालमत्ता आहे, याची माहिती सर्वांनाच आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री स्व. बंगारप्पा यांच्या कार्यकाळात १ लाख रुपयांना घेतलेल्या जागेची किंमत आज २० कोटी रुपये झाली आहे. यामध्ये कोणताही घोटाळा किंवा लाचखोरी झालेली नाही, असे स्पष्टीकरण शिवकुमार यांनी दिले. सर्व संपत्तीची घोषणा निवडणूक आयोग आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) आधीच केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुमारस्वामी यांना बाहेर चर्चा करण्याची इतकीच इच्छा असेल तर त्यांनी विधानसभेत येऊन चर्चा करावी किंवा फ्रीडम पार्क येथे जावे, असे शिवकुमार म्हणाले. फोन टॅपिंग आणि ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाला आपण घाबरत नाही. विरोधक केवळ सरकारच्या लोकप्रियतेला घाबरून अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आमदार यतींद्र सिद्धरामय्या यांच्यावरील ४४४ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे पायाहीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच नवी दिल्लीत दक्षिण भारतीय राज्यांची शिक्षण परिषद पार पडली असून, यामध्ये परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष मार्गदर्शन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कंत्राटदारांच्या थकीत बिलाबाबत बोलताना, भाजपच्या काळातील आर्थिक चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असली तरी यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments