Belagavi

बेळगाव महानगरपालिका बैठकीत ध्वनिक्षेपक यंत्रणा कोलमडली

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत ध्वनिक्षेपक आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने मोठा गदारोळ झाला.

महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पालिका कौन्सिलची सर्वसाधारण बैठक सुरू असताना सुरुवातीपासूनच ध्वनिक्षेपक व्यवस्थित चालत नव्हते. वारंवार सूचना देऊनही अधिकारी यंत्रणा पूर्ववत करू न शकल्याने, विरोधी नगरसेवकांनी स्वतःची स्वतंत्र ध्वनिक्षेपक यंत्रणा आणून सभागृहात बसवली आणि चर्चा पुढे सुरू ठेवली.

विरोधी नगरसेवकांनी स्वतःची यंत्रणा वापरल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरगीहाळ यांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सभागृहात उंदरांचा वावर असल्याचे सांगत पालिका इमारतीच्या दुरवस्थेवर आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीवर त्यांनी कडक कारवाईची मागणी केली. तर बैठक सुरळीत पार पडावी म्हणूनच ही व्यवस्था केल्याचे विरोधी नगरसेवक मुझम्मिल ढोणी यांनी स्पष्ट केले.

या गोंधळामुळे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Tags: