बाची आणि सुळगा येथील ग्रामस्थांच्या बहुप्रतिक्षित मागण्यांची दखल घेत, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी क्रीडांगण आणि सार्वजनिक तलावासाठी आवश्यक असणारी शासकीय जमीन मंजूर करून घेतली आहे.


या संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दोन्ही गावांतील सार्वजनिक गरजा मांडल्या. चर्चेअंती बाची येथील शासकीय मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणासाठी महसूल विभागाची ३ एकर जमीन शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा अधिकृत आदेश प्राप्त झाला. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेट, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉलसारख्या खेळांसाठी भव्य मैदान उपलब्ध होणार आहे.

तसेच सुळगा गावात ४ एकर जमीन सार्वजनिक क्रीडांगणासाठी आणि २ एकर जमीन सार्वजनिक तलावासाठी बेळगाव तालुका पंचायतीकडे मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा व शारीरिक विकासासाठी पुरेशा सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बाची आणि सुळगा परिसरातील क्रीडा उपक्रमांना तसेच मूलभूत सुविधांच्या विकासाला मोठा वेग मिळणार आहे.


Recent Comments