Bailahongala

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Share

चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यामध्ये उघडकीस आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील गोल्लर गल्ली येथे ही घटना घडली आहे. लक्ष्मी मडमगेरी ( वय ३१)असे मृत महिलेचे नाव असून पती राजू मडमगेरी असे तिच्या पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, १७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या या दांपत्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. पतीच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी गेल्या सात महिन्यांपासून वेगळी राहत होती आणि तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता. सोमवारी दुपारी चर्चेच्या बहाण्याने आरोपी पतीने लक्ष्मीला दुचाकीवरून नेत अमटूर आणि नयानगर दरम्यान रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून त्याने पुन्हा वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने पतीने तिला झुडपात नेऊन डोक्यात दगड घालून ठार करत मृतदेह झुडपात फेकून पळ काढला. या घटनेवर बोलताना, आरोपी राजूने संगनमत करून ही हत्या केली असून त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मृत लक्ष्मीचे नातेवाईक निर्मला आणि उमेश यांनी दिली.

सध्या बैलहोंगल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Tags: