राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाल्याबाबत वित्त विभागाने मुख्यमंत्र्यांना अधिकृत माहिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस सरकारने राज्याची तिजोरी लुटल्याचा आरोप करत धारवाडमध्ये भाजपने निदर्शने केली.


हुबळी -धारवाड महानगर जिल्हा भाजप घटकाच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतयात्रेसह तीव्र रोष व्यक्त केला.

शहरातील हिंदी प्रचार सभेच्या आवारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत, वित्त विभागाचे पत्रच या सरकारच्या कारभाराचा पुरावा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
गॅरंटी योजनांच्या नावाखाली सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यापूर्वी महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलने करत सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने आता पुन्हा महागाई वाढवून केंद्राकडे बोट दाखवणे सुरू केले आहे, असे ते म्हणाले. तिजोरी रिकामी झाल्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.


Recent Comments