मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सर्व समस्या एका रात्रीत सोडवायला काही जादूगार किंवा सर्वज्ञ नाहीत, सर्व कामे एकाच वेळी पूर्ण होणे शक्य नसून उत्तर कन्नड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार लक्ष्मण सवदी यांनी कुमटा येथे पत्रकारांशी बोलताना केले.

मंगळुरूमधील मंत्रिमंडळ बैठक केवळ माशांचे जेवण करण्यासाठी आयोजित केली होती, या भाजप आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्या टीकेला लक्ष्मण सवदी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. यत्नाळ यांचे काम केवळ आरोप करणे आणि दुधात खडे शोधणे हेच आहे, परंतु त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

मंगळूर येथील कॅबिनेट बैठकीत किनारपट्टी भागासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता कंत्राटी भरतीद्वारे दूर केली जाईल. तसेच वाहतूक महामंडळाला नवीन बसेस पुरवून समस्या सोडवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या काळात या भागातील अनेक आमदार आणि मंत्री असतानाही त्यांनी तुळू भाषेला मान्यता दिली नाही, ती मान्यता आमच्या सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ‘प्रजासेवा’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी कारभार जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा नवा उपक्रम सुरू केला असून, सर्व आमदार यात सहभागी होऊन स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या समस्या सोडवतील, असे सवदी यांनी स्पष्ट केले.


Recent Comments