येत्या १९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हुबळीतील गब्बूर येथील ‘केएलई ३,००० मठ वैद्यकीय महाविद्यालय’ आणि १,२०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांनी दिली.


पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रभाकर कोरे म्हणाले की, ३,००० मठाकडून दान मिळालेल्या ५० एकर जागेवर हा संपूर्ण वैद्यकीय परिसर साकारण्यात आला आहे. यासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, ३० लाख चौरस फुटांपेक्षा जास्त जागेत शैक्षणिक, वैद्यकीय आणि संशोधन सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची (NMC) मान्यता मिळालेल्या या महाविद्यालयात २०२२ पासून पहिली बॅच सुरू झाली आहे. सध्या येथे ८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, एमबीबीएसची प्रवेश क्षमता २०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून २० विभागांमध्ये पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.
१ जानेवारी २०२५ पासून हे १,२०० खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले असून, यात मल्टि-स्पेशालिटी आणि सुपर-स्पेशालिटी वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत. आपत्कालीन सेवा, ट्रॉमा केअर, आयसीयू आणि अद्ययावत शस्त्रक्रिया गृहांसह न्यूरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी, युरॉलॉजी यांसारखे महत्त्वाचे विभाग सुरू झाले आहेत.
पुढील टप्प्यात कार्डिओलॉजी, ऑन्कोलॉजी आणि अवयव प्रत्यारोपण सेवा सुरू करण्याचा मानस आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांअंतर्गत सेवा दिल्या जात आहेत. हा परिसर उत्तर कर्नाटकातील आरोग्य सेवेचे प्रमुख केंद्र बनेल, असे प्रभाकर कोरे यांनी सांगितले.
हा सोहळा हुबळी ३,००० मठाचे जगद्गुरू श्री गुरुसिद्ध राजयोगेंद्र महास्वामीजी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, कामगार मंत्री संतोष लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला शंकरण्णा मुनावल्ली, संदीप श्रीवास्तव, मंजुनाथ मुनावल्ली, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. बाबाजी देवडे, एम. जी. हिरेमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments