Belagavi

बेळगाव इस्कॉन मंदिरात रंगणार तीन दिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

Share

बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरात यंदाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव अत्यंत थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. या सोहळ्यानिमित्त श्री राधा गोकुलानंद यांची मूर्ती आणि मंदिर परिसर आकर्षक रीतीने सजवण्यात आला आहे.

या सजावटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे बाजारातील फुलांऐवजी भाविकांनी स्वतःच्या बागांमधून आणलेल्या नैसर्गिक फुलांचा वापर करून सुंदर मंडप आणि आकर्षक पुष्पहार तयार केले आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सलग तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

या महोत्सवामध्ये भगवान श्रीकृष्णाचा विशेष महाअभिषेक, गोपूजा, भगवद्गीता प्रवचन, महाआरती, अखंड नामसंकीर्तन आणि भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवाच्या अंतिम दिवशी प्रभुपाद व्यासपूजा आणि थक्क करणारा दहीहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून, सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडावेत यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि आसपासच्या भागातील सर्व श्रीकृष्ण भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनचे गौरांग प्रसाद दास यांनी केले आहे.

Tags: