Belagavi

बेळगावात हिंदू-मुस्लिम सलोख्यात ईद-ए-मिलाद सोहळा उत्साहात संपन्न

Share

बेळगावात बारा इमाम बी माली मोहल्ला जमात आणि सीरत समितीच्या वतीने ईद-ए-मिलाद पर्व अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात आले.

जिन्ना चौकात आयोजित करण्यात आलेल्या मंच कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रमुख, जनप्रनिधी आणि अधिकारी उपस्थित राहून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. या समारंभाध्ये उत्तरचे आमदार आसीफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, नगर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेळगावात सर्व धर्मांचे बांधव एकाच मंचावर बसून सण साजरा करत असल्यामुळे हा सोहळा देशासाठी आदर्श ठरत असल्याचे मौलाना मुफ्ती मंजूर यांनी सांगितले. युवकांनी ईश्वराचा संदेश समजून व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कोणीही संकटात असेल तर त्यांना मदत केली पाहिजे आणि भुकेल्यांना अन्न दिले पाहिजे, असे आमदार आसीफ सेठ यांनी सांगितले. प्रेमाच्या आणि शांततेच्या मार्गावर आपण सर्वांनी चालले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव आणि ईंद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सव एकाच वेळी आल्यावर मिरवणूक पुढे ढकलून बेळगावच्या जनतेने कर्नाटकासमोर नवा आदर्श ठेवला आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. ही सलोख्याची भावना सदैव कायम राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सण-उत्सवांचे महत्त्व आणि माणसांच्या सुख-दुःखाचा विचार करूनच सण साजरे केले पाहिजेत, असे माजी आमदार फिरोज सेठ यांनी नमूद केले. मोहरम दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार चांगली कृत्ये करून सामाजिक सलोखा कायम राखला पाहिजे, असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील यांनी केले.

यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. जिन्ना चौकातून सुरू झालेली मिरवणूक फोर्ट रस्ता, मध्यवर्ती बस स्थानक, संगोळी रायन्ना सर्कल , राणी चन्नम्मा चौक आणि कॉलेज रोड मार्गावरून कॅम्पमधील असायदखान दर्ग्यापर्यंत पोहोचून समाप्त झाली.

Tags: