State

एकच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सतीश जारकीहोळींकडून पूर्णविराम

Share

मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याचा विषय आणि एकाच उपमुख्यमंत्र्यांच्या पदावरून सुरू असलेल्या वादावर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुका जवळ आल्याने विरोधी पक्ष अशा छोट्या गोष्टींचे मोठे भांडवल करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या समाजालाच लक्ष्य केले जात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना, राजीनामा मागणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असला तरी तो फेटाळण्याचा अधिकार सरकारला आहे, असे त्यांनी सांगितले. यावर पक्ष आणि सरकार योग्य उत्तर देईल, तसेच निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे वाद समोर येणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले.

एकाच उपमुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर बोलताना जारकीहोळी यांनी सांगितले की, जनतेमध्ये कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठीच एकाच उपमुख्यमंत्र्याची निवड करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळातही एकाच उपमुख्यमंत्र्याची व्यवस्था होती आणि तीच आजही कायम आहे. त्यावेळीही चार उपमुख्यमंत्र्यांची मागणी झाली होती, परंतु आता यावर चर्चा करणे पूर्णपणे निरर्थक आहे. जनतेची सेवा करण्यासाठी विशिष्ट पदाची गरज नसून मंत्री म्हणूनही उत्तम काम करता येते, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

Tags: