१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुणे विभागाच्या वतीने सीमाप्रश्नाबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले.


किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांना सीमाभागातील परिस्थितीची माहिती देऊन पाठिंब्याचे आवाहन करण्यात आले. म. ए. समिती पुणे विभागाचे विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आले. कार्यकर्त्यांनी प्रतापगडावरील तुळजाभवानी मंदिरात जाऊन सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी विशेष पूजा व आरती करून साकडे घातले. सुट्टीचा दिवस असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांशी नेत्यांनी संवाद साधला. १९५६ च्या भाषावार प्रांत रचनेवेळी सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर झालेला अन्याय आणि कर्नाटक सरकारच्या भूमिकेविषयी त्यांनी असंतोष व्यक्त केला.

या प्रसंगी ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आरपीआय (आठवले) वाई तालुका अध्यक्ष प्रताप जाधव आणि १९८६ च्या सीमा आंदोलनात सहभागी झालेले ८० वर्षीय मनोहर त्रिंबक पटवर्धन यांची म. ए. समितीच्या नेत्यांनी भेट घेतली. या अभियानात अजित कुमठेकर, रामदास पाखरे, पंकज दास यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments