Belagavi

मंत्री नागेंद्र यांच्या हकालपट्टीसाठी बेळगावात भाजपचे अहोरात्र धरणे आंदोलन

Share

महर्षी वाल्मीकी महामंडळातील सुमारे १८७ कोटी रुपयांचा निधी लुटल्याचा आरोप करत मंत्री बी. नागेंद्र यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीसाठी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्यांनी अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केले आहे.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी, “मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा देत सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारमधील भ्रष्टाचाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण रात्रीही याच ठिकाणी मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार संजय पाटील यांनी, “राज्यात भ्रष्टाचाराचा नवा खेळ सुरू असून वरिष्ठ नेत्यांना डावलून मंत्रिपद दिलेल्या नागेंद्र यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे,” असा गंभीर आरोप केला. मंत्री नागेंद्र यांनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर आणि सभागृहात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहोरात्र आंदोलन सुरू करण्यात आल्याचे माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. वाल्मीकी समाजाचा निधी गैरमार्गाने वापरणाऱ्या या सरकारचा निषेध नोंदवत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, “भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले नेते मंत्रिमंडळात राहू नयेत, हाच आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय अपंगांचा भत्ता, दुष्काळ आणि पीक नुकसानीची भरपाई देण्यात सरकार अपयशी ठरले आहे,” असा आरोप केला. या आंदोलनात माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांच्यासह अनेक प्रमुख भाजप नेते सहभागी झाले होते.

Tags: