गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यामुळे जागतिक दर्जाचा प्रसिद्ध दुधसागर धबधबा पूर्ण वेगाने प्रवाहित झाला आहे. आकाशातून थेट दुधाची नदीच खाली कोसळत असल्याचा भास निर्माण करणारे हे विहंगम दृश्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


मांडवी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे गोवा-कर्नाटक सीमेवरील निसर्गाचे एक अद्भूत रूप पाहायला मिळत आहे. हिरव्यागार वनराईच्या मध्य भागातून सुमारे ३१० मीटर उंचीवरून कोसळणारा दुधसागर धबधबा निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. कॅसल रॉक येथील कठीण खडक आणि रेल्वेचे ९ बोगदे पार केल्यानंतर दिसणारा हा परिसर सध्या जलवैभवाने नटला आहे.


बेळगाव, गोवा आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांच्या सीमाभागात असलेल्या या जागतिक पर्यटनस्थळावर सध्या निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मात्र उपस्थित नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी रेल्वे ट्रॅकवर पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने घातलेली ही बंदी अद्यापही कायम आहे.
निसर्गाचे हे विलोभनीय रूप जवळून अनुभवता येत नसल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटनप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. धबधब्यावर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. कडक नियमावली तयार करून पर्यटकांना पुन्हा सुरक्षितपणे प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी आता सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येत आहे.


Recent Comments