मुले कितीही मोठी झाली तरी आईची माया कधीही कमी होत नाही, याचा प्रत्यय देणारी एक सुन्न करणारी घटना विजापूर तालुक्यातील कन्नूर गावात घडली आहे.

आजारपणामुळे ४८ वर्षीय सिदरायगौडा पाटील यांचे बुधवारी रात्री विजापूर शहरातील रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी ७२ वर्षांच्या आई चन्नम्मागौडती पाटील यांना सांगण्यात आली. मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईची प्रकृती खालावली आणि तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

एकाच दिवशी आई आणि मुलगा दोघांचेही निधन झाल्याने कन्नूर गावातील शेतात एकाच ठिकाणी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी कुटुंबातील दोन सदस्यांना गमावल्यामुळे नातेवाइकांचा आक्रोश काळजाला भिडणारा होता, तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. मृत्यूनंतरही आई-मुलाची साथ कायम राहिल्याच्या या घटनेने ग्रामस्थांचे डोळे पाणावले.


Recent Comments