बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी येथे २५ जुलै रोजी कारस्फोट घडवून सावकाराची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी येथे २५ झालेल्या एसयूव्ही कार स्फोट प्रकरणाचा पोलिसांनी अखेर यशस्वीरीत्या छडा लावला आहे. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे कारचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र विहीर खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या काड्यांच्या स्फोटामुळेच ही घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कर्जाची रक्कम परत करणे शक्य नसणे आणि जमीन देण्याची इच्छा नसल्याने सावकाराचाच काटा काढण्यासाठी कट रचणाऱ्या विजापूर येथील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

२५ जुलै रोजी हिप्परगी येथील एका वाईन शॉपसमोर उभी असलेली मालक हनुमंत अथणी यांची कार स्फोटात उद्ध्वस्त झाली होती. बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या तपासात या घटनेमागील वास्तव समोर आले. आरोपी शिवानंद याने चार वर्षांपूर्वी हनुमंत यांच्याकडून ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, जे व्याजासह ६७ लाख रुपये झाले होते. कर्जाची रक्कम परत करणे शक्य नसल्याने हनुमंत यांनी ५ एकर जमीन लिहून देण्याची मागणी केली होती. यावरून संतापलेल्या शिवानंदने आपल्या साथीदारांसह हनुमंत यांची हत्या करण्यासाठी या स्फोटाचा कट रचला होता.
विहीर फोडण्याचे काम करणाऱ्या शिवानंदचा भाऊ गजानन याच्याकडील ८०० जिलेटीन काड्यांपैकी २५ ते ३० काड्यांचा वापर करून १०० मीटर लांबीच्या वायरद्वारे शेजारच्या ऊसाच्या शेतात बसून कारचा स्फोट घडवून आणला होता. हे कृत्य केल्यानंतर काही दिवसांनी आरोपींनी हनुमंत यांच्या मोबाईलवर धमकीचा संदेश पाठवला, जो पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. या सिम आणि मोबाईलचा माग काढत पोलिसांनी विजापूर जिल्ह्यातील तिगणीबिदरी येथील शिवानंद जल्ली, रेवणप्पा जल्ली, मादेव सांगापूर आणि मल्लिकार्जुन या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. फरार झालेला अन्य एक आरोपी गजानन याचा पोलीस शोध घेत आहेत.


Recent Comments