Belagavi

७ वर्षांपासून शास्त्री नगरचा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत!

Share

बेळगावमधील शास्त्री नगर आणि परिसरातील गेल्या ७ वर्षांपासून खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी प्रशासनाला दिला आहे.

शास्त्री नगर आणि गुड्स शेड रोड गेल्या ६ ते ७ वर्षांपासून एल अँड टीच्या कामामुळे पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वार व नागरिक दररोज अपघाताला बळी पडत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक महिला आणि वृद्धांना गंभीर दुखापती झाल्याचे नागरिक विशाल देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी सांगितले. खड्ड्यांमधील चिखलाचे पाणी वाहनांमुळे शाळकरी मुलांच्या कपड्यांवर उडत असल्याने त्यांना शाळेत न जाता घरी परतावे लागत आहे. हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड आकारणाऱ्या प्रशासनाला रस्त्यावरील हे मोठे खड्डे दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. महात्मा गांधी नगर विकास योजनेंतर्गत या रस्त्याला २ वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली असतानाही महापालिका केंद्र सरकारचे कारण सांगून काम टाळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकदा या रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करून नागरिकांचे हाल अनुभवावेत, असे आव्हान रहिवाशांनी दिले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास शास्त्री नगर आणि परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन तीव्र रस्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

Tags: