Belagavi

डीसीसी बँक भरतीत सरकारी नियमांचे उल्लंघन : भीमाप्पा गडाद यांचा आरोप

Share

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १०४ पदांच्या भरतीत मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे.

उत्तर कर्नाटक लढा समितीचे अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी डीसीसी बँकेतील विविध १०४ पदांच्या थेट भरतीप्रक्रियेत सरकारी नियम पायदळी तुडवले गेल्याचा आरोप केला आहे. शासनाच्या वयोमर्यादा शिथिलतेच्या आदेशाचे पालन न केल्याने पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. तसेच एसडीसी पदांसाठी केवळ बी.ए, बी.एससी आणि बी.कॉम धारकांनाच संधी देऊन बी.ई आणि बी.टेक पदवीधरांना प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेतल्यास गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याने ही परीक्षा ‘कर्नाटक परीक्षा प्राधिकरणा’मार्फत (केइए) घेण्यात यावी, ओएमआर शीट अपलोड करण्यात याव्यात आणि मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच यातील त्रुटी दूर न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला असून सहकार मंत्री, आरबीआय आणि नाबार्डकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा गडाद यांनी केला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रचंड खर्च करून निवडून आलेल्या प्रभावशाली राजकारण्यांकडून ती रक्कम वसूल करण्यासाठी एका-एका पदासाठी ५० ते ६० लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्याची भरती जाहिरात तत्काळ रद्द करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अन्यथा नियमांच्या उल्लंघनाविरोधात न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Tags: