केवळ प्रौढांमध्ये दिसणारा हृदयविकाराचा झटका आता लहान मुलांमध्येही वेगाने वाढू लागल्याचे समोर आले असून हुबळी येथील ‘किम्स’ (KIMS) बहुविद्याशाखीय संशोधन केंद्राने देशात पहिल्यांदाच केलेल्या एका अभ्यासातून हा अत्यंत चिंताजनक खुलासा झाला आहे.


नोडल अधिकारी डॉ. राम कवलगुड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. या अभ्यासांतर्गत १३ राज्यांमधील ३४७ मुलांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये धारवाड जिल्ह्यातील ६२ कॉलेज विद्यार्थ्यांचाही समावेश होता. ८ ते १८ वयोगटातील जास्त वजन असलेल्या मुलांची निवड करून त्यांची उंची, वजन, रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या धमन्यांमधील ‘एंडोथेलियम’ची तपासणी करण्यात आली. यातील तब्बल ७० टक्के मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणारे घटक आढळून आले आहेत.


इतकेच नव्हे तर १७ टक्के मुलांमध्ये ‘एंडोथेलियम’चे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास पुढील १० ते १५ वर्षांत मुलांना हृदयविकार किंवा किडनीच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लहान मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा, शारीरिक व्यायामाचा अभाव, जंक फूडचे व्यसन, थंड पेये तसेच जास्त साखर आणि मीठ असलेले अन्न सेवन करणे यांमुळे हा धोका निर्माण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुलांची शारीरिक हालचाल वाढवणे आणि पाश्चात्य खाद्यसंस्कृती टाळून योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. ‘किम्स’ संस्था हा चिंताजनक अहवाल राज्य व केंद्र सरकारला सादर करणार आहे.


Recent Comments