खानापूर तालुक्यातील हलसी बस स्थानकावरून हलसीवाडी आणि गुंडप्पी गावांना जोडणारा रस्ता तयार झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत पूर्णपणे उखडला असून प्रशासनाच्या या गलथान कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या हलसी श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान हलसी बस स्थानक-हलसीवाडी-गुंडप्पी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, हा रस्ता आता पूर्णपणे खराब झाला आहे. किरकोळ पावसातही रस्त्यावरील डांबर उखडले असून मोठे खड्डे पडले आहेत. लाखो रुपयांचा शासकीय निधी वाया गेल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

येत्या काळात कारलगा गावाची यात्रा येत असून, त्या पार्श्वभूमीवर लालवाडी-चापगाव रस्त्याचे काम घाईगडबडीत न करता दिवाळीपासूनच सुरू करून गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. शासकीय निधी वाया जाऊ नये म्हणून संबंधित विभागाच्या तांत्रिक पथकाने तत्काळ पाहणी करावी आणि दोषी ठेकेदाराकडूनच स्वतःच्या खर्चाने पुन्हा रस्ता तयार करून घ्यावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला आहे.


Recent Comments