Belagavi

बेळगावात अज्ञात वृद्धाचा अपघातात मृत्यू; दुचाकीच्या धडकेने दुर्घटना, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन!

Share

बेळगाव येथील गांधीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या अपघातात एका अज्ञात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास हलगा येथून काकतीकडे एनएच ४८ वरून मल्लेशप्पा नावाचे गृहस्थ आपल्या दुचाकीवरून जात असताना, गांधीनगर रेल्वे पुलाजवळ पायी जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार मल्लेशप्पा हेदेखील जखमी झाले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या ६० ते ६५ वयोगटातील अज्ञात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

मृत व्यक्तीचा चेहरा लांबट, नाक जाड, रंग गव्हाळ असून डोक्यावर १ इंच लांबीचे काळे-पांढरे केस आहेत. अंगात मरून रंगाचा हाफ शर्ट आणि काळ्या रंगाची नायलॉन नाईट पॅन्ट परिधान केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाची शस्त्रक्रिया झालेली असून मनगट नाही.

सध्या हा मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. या मृत व्यक्तीचे नातेवाईक किंवा वारसदार आढळल्यास तत्काळ उत्तर वाहतूक पोलीस ठाणे (०८३१-२४०५२४० / ९४८०८०४१०३) किंवा पोलीस कंट्रोल रूम (०८३१-२४०५२७८) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: