मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदांच्या घोषणेबाबत लोकसभेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात आतापर्यंत उपमुख्यमंत्री पदांबाबत चर्चा झालेली नाही; खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ रचनेवरून राजकीय चर्चा सुरू असताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जामिनावर बाहेर असलेल्या नागेंद्र यांना मंत्रिपद देण्याबाबत विचारले असता, हा निर्णय हायकमांडने घेतला आहे. पक्षातील सर्व वरिष्ठांनी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्र्यांची घोषणा अद्याप न झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “पक्षात यावर अजून चर्चा झालेली नाही. खातेवाटप पूर्ण झाल्यानंतर यावर चर्चा होईल. हा निर्णय कधीही घेतला जाऊ शकतो.” तसेच काही पदांसाठी पैसे देण्यात आल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर बोलताना, “ही केवळ अफवा आहे. नक्की कोणाला पैसे दिले गेले हे त्यांनी जाहीर करावे,” असे सांगत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांची कमतरता असल्याच्या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले, “महिलांसाठी एक जागा रिक्त आहे. महिला प्रतिनिधित्वाशिवाय मंत्रिमंडळ पूर्ण होऊ शकत नाही. हायकमांड लवकरच यावर निर्णय घेईल.” तसेच कोरटगेरे येथील राजीनाम्याच्या मुद्द्याची कायदेशीर चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, सिद्धरामय्या कदाचित नाराज असू शकतात, मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ‘राजीनामा दिला तर स्वीकारू’ या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संवाद आणि संयम हाच प्रत्येक समस्येवर उपाय आहे. सर्वांनाच मंत्रिपद देणे शक्य नसते. मर्यादित जागांमुळे मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेते बाहेर राहणे स्वाभाविक आहे.


Recent Comments