आमच्या सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. दुसऱ्या कोणत्याही सरकारने केली नसतील अशी कामे करून आम्ही लोकांचे हृदय जिंकले आहे. त्यामुळे तुम्ही जसे तुमचे घर आणि मंदिर सांभाळता, तसेच या सरकारलाही सांभाळा, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.


कर्नाटक राज्य मुजराई मंदिर पुजारी, पुरोहित आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने बंगळुरू येथे बुधवारी आयोजित राज्यस्तरीय महासभा व मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या सत्कार समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पुजारी व मंदिरांच्या हितासाठी ऐतिहासिक काम केले आहे. आमच्या सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे ५ गॅरंटी लागू करून नागरिकांचा मोठा आधार बनले आहे, असे ते म्हणाले.


या प्रसंगी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, “धर्माचा काही पक्षांनी ठेका घेतल्यासारखे बोलले जाते, पण ते केवळ पोकळ दावे करतात. त्यांनी पुजाऱ्यांच्या आयुष्यात कोणताही बदल घडवून आणलेला नाही. हिंदू धर्म आणि मंदिरांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्धतेने काम करत असून, पारदर्शकतेसाठी मोठ्या मंदिरांच्या दानपेटीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

गावागावांतील सुमारे ३४ हजार मंदिरांत पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना ३ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी जर संघटना आणि मठ पुढे आले, तर सरकारकडून सर्व ती मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय, पुजाऱ्यांच्या मागणीनुसार मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याकडेच मुजराई विभागाची जबाबदारी ठेवण्यास सरकार तयार असून, त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महासभेला राज्यातील विविध भागांतून आलेले हजारो पुजारी, आगमिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments