योग्य बस सेवा पुरवण्याची मागणी करत बुधवारी खानापूर तालुक्यातील पारिश्वाड येथील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.


शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी दररोज बसच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून सरकार आणि परिवहन विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खानापूर तालुक्यातील पारिश्वाडसह आसपासच्या गावांतील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षण घेण्यासाठी खानापूर आणि इतर शहरांमध्ये जातात. मात्र, या मार्गावर पुरेशा प्रमाणात बस धावत नसल्याने विद्यार्थ्यांना तासन् तास ताटकळत राहावे लागत आहे. सकाळी येणाऱ्या काही मोजक्याच बस प्रवाशांनी खच्चाखच्च भरलेल्या असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढणेही शक्य होत नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वर्गात पोहोचायला उशीर होत असून, काहींचे महत्त्वाचे धडे चुकतात, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला.

परिवहन विभागाला अनेकदा विनंती करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी विशेष जादा बसची व्यवस्था तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच आहे, परंतु पायाभूत वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गदा येत आहे. परीक्षा आणि वर्गात वेळेवर पोहोचता येत नसल्याने मानसिक ताण सहन करावा लागत आहे. सरकारने आणि परिवहन विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.


Recent Comments