Belagavi

वाटाळ नागराज यांची पुन्हा वटवट! बेळगाव मनपा बरखास्तीची मागणी करत १३ ऑगस्टला ‘कर्नाटक बंद’ची हाक

Share

बेळगाव हा कर्नाटकाचाच भाग असल्याचा ठराव महापालिकेने त्वरित मंजूर करावा, अन्यथा महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत कन्नड चळवळ पक्षाचे अध्यक्ष वाटाळ नागराज यांनी पुन्हा एकदा आपली वटवट सुरू केली आहे.

बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मागण्यांचे तुणतुणे वाजवत त्यांनी १३ ऑगस्ट रोजी ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली आहे. सीमाभागात मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या म. ए. समिती या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी वल्गना वाटाळ नागराज यांनी या पत्रकार परिषदेत केली. बेळगाव महापालिकेने कन्नडधार्जिणा ठराव घ्यावा यासाठी सरकारवर दबाव आणत त्यांनी मंत्री डॉक्टर यतींद्र सिद्धरामय्या यांच्याकडे महापालिका बरखास्तीची कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. यासोबतच सीमाबाहेरील कन्नड भाषिकांच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, बेळगावात केवळ कन्नड संघटनांमुळेच कन्नड जिवंत आहे. सुवर्णसौधमधील अधिवेशनात लोकप्रतिनिधी उत्तर कर्नाटक, कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकच्या समस्यांवर आवाज उठवत नाहीत. एकीकरणाचा मूळ उद्देशच विसरला गेला आहे, असा आरोप करत त्यांनी आगामी अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील सरकारच्या योगदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही केली.

राज्य सरकारच्या पाणी आणि सीमा धोरणांवर टीका करत कावेरी, म्हादई आणि कळसा भांडुरा प्रकल्पांबाबत लढण्याची ताकद सरकारने गमावली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचे बोलणे केवळ पोकळ असून भाषिक प्रांत व्हायला हवा असलेला कर्नाटक आज जातींवर आधारित प्रांत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डी. के. शिवकुमार यांनी मेकेदाटू पदयात्रा काढून आता मौन बाळगले आहे, असा आरोप करत त्यांनी बँका आणि रेल्वे क्षेत्रांमध्ये कन्नड भाषिकांना प्राधान्य देण्यासह विविध मागण्यांसाठी १३ ऑगस्ट रोजी कर्नाटक बंद पाळला जाईल, असा इशारा दिला.

यावेळी कन्नड क्रियाशील समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: