खानापूर तालुक्यातील हलकर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गरीब कुटुंबांना मूलभूत सुविधा व नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंचायत विकास अधिकाऱ्याविरुद्ध (PDO) कर्नाटक रक्षण वेदिकेने (मल्लीकार्जुन गट) तीव्र आंदोलन छेडले आहे.

खानापूर येथील गांधीनगरच्या तिसऱ्या गल्लीत गेल्या ४० वर्षांपासून राहणाऱ्या अत्यंत गरीब अशा बंगीबोळ कुटुंबाला अद्याप ग्रामपंचायतीकडून घरनिहाय उतारा तसेच विजेची जोडणी देण्यात आलेली नाही. इतर नागरिकांना कागदपत्रे देणारे पीडीओ या गरीब कुटुंबाच्या अर्जाकडे दुर्लक्ष करत असून, नागरिकांचे फोनही उचलत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित अधिकाऱ्यावर अनधिकृत लेआउटप्रकरणीही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे सार्वजनिक कामे खोळंबून ठेवणाऱ्या या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी करवेचे संस्थापक अध्यक्ष मल्लीकार्जुन मरकुंबी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
गेल्या दीड वर्षापासून या कुटुंबाला भेडसावणाऱ्या समस्येमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप करवेच्या नेत्यांनी केला आहे. योग्य कागदपत्रांअभावी मुलांच्या शिक्षणातही अडचणी येत असल्याचे करवेचे जिल्हाध्यक्ष मल्लप्पा गुडगेनाट्टी यांनी सांगितले. तर बाधित कुटुंबाला न्याय आणि मूलभूत सुविधा मिळेपर्यंत अहोरात्र धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा करवेच्या प्रतिनिधी फरीदा नदाफ यांनी दिला आहे.


Recent Comments