Belagavi

वडगावात रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेला निवेदन

Share

बेळगावातील वडगाव आणि मंगाई नगर भागातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी श्री मंगाई नगर रहिवाशी संघाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आगामी मंगाईदेवी यात्रेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
श्री मंगाई नगर रहिवाशी संघाच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर केले.

वडगाव आणि मंगाई नगर परिसरात खाजगी कंपनीच्या कामासाठी खणलेले खड्डे अद्याप योग्य प्रकारे बुजवण्यात आलेले नाहीत. प्रत्येक गल्लीत ३० ते ४० खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर पाणी साचून गटारी व रस्त्यांवरील दिव्यांची समस्या निर्माण झाली आहे. येत्या ११ ऑगस्टपासून वडगावची ग्रामदेवता श्री मंगाईदेवी यात्रा सुरू होत असून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि दिव्यांची सोय महापालिकेने करावी. येत्या आठ दिवसांत ही समस्या न सुटल्यास महापालिका आणि एल अँड टी कंपनीच्या कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा बंडू केरवाडकर यांनी दिला आहे.

या वेळी विक्रम खंडागळे, विनायक आरकसाली, भालचंद्र उचगावकर, मंजुनाथ कडोलकर, रमेश कडोलकर, रेमन्नाचे, गणपती कडोलकर, किशोर तरळेकर, नारायण पवार, गंगाराम, बाळकृष्ण चव्हाण, सुनील चव्हाण, गिरीश मोदगेकर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Tags: