दावणगेरे येथील वृत्ती रंगायतनच्या वतीने बेळगावातील बसवराज कट्टीमनी सभागृहात महिलांसाठी १५ दिवसांची विशेष रंगसंगीत व अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

लोप पावत चाललेली व्यावसायिक रंगभूमी आणि रंगसंगीताची परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. २४ जुलैपासून सुरू झालेल्या या शिबिरात पंडित राजाप्रभू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीष जोशी, मंजुळम्मा जोशी आणि गुरुराज कुलकर्णी हे संगीततज्ज्ञ सहभागींना प्रशिक्षण देत आहेत. व्यावसायिक रंगभूमीची समृद्ध संगीत परंपरा आणि अभिनयातील बारकावे महिलांना शिकवले जात आहेत, असे संचालक मल्लिकार्जुन कडकोळ यांनी सांगितले.

आठ ऑगस्ट रोजी या शिबिराचा समारोप होणार असून, या दिवशी सहभागी महिला कलाकार रंगभूषा व वेशभूषेत मंचावर रंगसंगीत आणि अभिनयाचे सादरीकरण करतील. या समारोपाच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि प्रादेशिक आयुक्त जानकी या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


Recent Comments