राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पिकनुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी बेळगावात मोठा मोर्चा काढला. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेतर्फे राज्याध्यक्ष वासुदेव मेटी तसेच प्रा. एम. डी. नंजुंडस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावात मोर्चाचे आयोजन करण्यात आले.होते. शहरातील राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला. काही काळ राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून वाहतूक रोखत शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेती कर्जमाफी करावी, तीन कृषी कायदे मागे घ्यावेत तसेच विविध सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.


यावेळी शेतकरी नेत्यांनी, मुख्यमंत्री आणि मंत्री हेही शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे सांगितले. अपुऱ्या पावसामुळे पेरणी, बियाणे आणि खतांवर खर्च करूनही पिके वाळून जात असून अनेक ठिकाणी जनावरांना चारा म्हणून ती वापरण्याची वेळ आली आहे. विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील रायबाग आणि मूडलगी तालुक्याच्या शेवटच्या भागात कालव्याचे पाणी पोहोचत नसल्याने राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून संकटग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपयांची भरपाई थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी वासुदेव मेटी यांनी केली.

ऊस आणि मका पिकांचे नुकसान वाढत असल्याने जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. खत आणि बियाणे वितरणासाठी लागू असलेले एफआयडी नियम शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना खत सहज उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी किमान ६० दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आले.
शेतकरी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांचा सत्कार केला. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.


Recent Comments