Belagavi

पावसाच्या पुनरागमनाने बेळगाव तालुक्यात भात लागवडीला वेग

Share

यंदा मॉन्सूनच्या लहरीपणामुळे शेतकरी वर्गाला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे रखडलेली भात रोप लागवडीची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

बेळगाव तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागात शेती हा केवळ व्यवसाय नसून तो स्थानिक अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस लांबल्याने बेळगाव तालुक्यातील शेतीकामांना विलंब झाला होता. मशागत आणि लागवडीची कामे खोळंबली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. पिकांसाठी आवश्यक ओलावा न मिळाल्याने काही ठिकाणी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.

मात्र, मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने परिस्थितीत बदल झाला आहे. जमिनीला आवश्यक ओलावा मिळाल्याने रखडलेली शेतीकामे पुन्हा सुरू झाली आहेत. बेळगावजवळील उचगाव, हिंडलगा आणि परिसरातील शेतांमध्ये सध्या भात रोप लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत.

चिखलमय झालेल्या शेतांमध्ये महिला आणि पुरुष शेतकरी भात रोप लागवडीसाठी मेहनत घेत आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकरी वर्गाकडून प्रयत्न सुरू असून, पावसाच्या पुनरागमनामुळे शेतीकामांना पुन्हा गती मिळाली आहे.

Tags: