Belagavi

बेळगावच्या वंटमुरी साई मंदिरात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा

Share

बेळगावच्या वंटमुरी येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा श्रद्धा आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात विशेष पूजा-अर्चा करण्यात आली असून हजारो भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले.

बेळगावच्या वंटमुरी परिसरातील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेसहा ते सात या वेळेत साईबाबांना विशेष अभिषेक, अलंकार, महापूजा आणि महाआरती करण्यात आली.

पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. लांब रांगेत उभे राहून भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

पूजा कार्यक्रमानंतर मंदिराचे पदाधिकारी बाबू अरवळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गुरुपौर्णिमेनिमित्त सायंकाळी मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

देशातील शेतकरी वर्गासह सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभावी, यासाठी श्री साईबाबांच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आल्याचे बाबू अरवळी यांनी सांगितले.

Tags: