Belagavi

शहापूरच्या नामदेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

Share

बेळगावच्या शहापूर येथील श्री नामदेव विठ्ठल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू असून, पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नामदेव देवकी संस्थेतर्फे श्री नामदेव विठ्ठल मंदिरात पहाटे विशेष महापूजा आणि अलंकार पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी देवीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळपासून शेकडो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले असून, विठ्ठलदेव गल्लीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

आषाढी एकादशी निमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी भजनासह शालेय विद्यार्थ्यांची दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण आणि रात्री महाआरती होणार आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

मंदिरात अनेक वर्षांपासून भाविक सेवाभावाने सहभागी होत असून, देवसेवेतच परमेश्वराचे दर्शन घडते, अशी भावना काही भाविकांनी व्यक्त केली.

Tags: