State

पंढरपुरात लाखो वैष्णवांची मांदियाळी…! विठ्ठल नामात न्हाऊन निघाली पंढरी!

Share

देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवो आणि जनतेच्या जीवनात आनंद आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी केली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात, अवघी पंढरी आज भक्तीच्या महासागरात तल्लीन झाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या पाऊलांनी आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजराने संपूर्ण पंढरपूर दुमदुमले असून, आषाढी एकादशीच्या या पवित्र सोहळ्याला आज अत्यंत चैतन्यमय आणि अभूतपूर्व असे स्वरूप प्राप्त झाले आहे.

यंदाच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्य बाळासाहेब माधव माने आणि प्रभावती बाळासाहेब माने यांना मिळाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पूजाविधीत सहभाग घेतला.

महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत, पांडुरंग हा कोट्यवधी भक्त आणि वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असल्याचे सांगितले. ही केवळ मुख्यमंत्र्यांची पूजा नसून लाखो विठ्ठल भक्तांची पूजा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यंदा वारीने नवा उच्चांक गाठला असून 25 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत भाविकांची रांग लागली. मात्र सर्व भाविकांची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत भाविक दर्शन घेत आहेत. जगाच्या पाठीवर असा आनंदाचा सोहळा दुसरा कुठेही नाही, जिथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात.” अशा भावना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

निसर्गावर विश्वास ठेवून जीवन जगणारा वारकरी म्हणजे शेतकरी असल्याचे सांगत, सरकारने यंदा ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, वीज बिल माफीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असले तरी दर्शन व्यवस्थेसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचे दर्शन मिळावे आणि त्यांच्यावर विठ्ठलाची कृपा राहावी, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Tags: