काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी एआयसीसीकडून राज्यात निरीक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्यातही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जात आहेत, अशी माहिती एआयसीसी निरीक्षक मनोज चव्हाण यांनी दिली.

बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एआयसीसीच्या सूचनेनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे मत, नेत्यांची कार्यपद्धती आणि पक्षाला पुढे नेण्याची क्षमता असलेल्या नेत्यांबाबत माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत केवळ वरिष्ठ नेत्यांच्या मतांवर अवलंबून न राहता ब्लॉक आणि मंडळ स्तरावरील पदाधिकारी तसेच सामान्य कार्यकर्त्यांच्या मतांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे मनोज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटन मजबूत करण्याची क्षमता असलेले आणि तळागाळात काम करण्याची तयारी असलेले जिल्हाध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे पक्षाच्या हिताचा विचार करून योग्य व्यक्तीची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अद्याप बाकी असून, देशातील बहुतांश राज्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत विविध विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसंदर्भातील अभिप्रायाचा अहवाल एआयसीसीकडे सादर केला जाईल, असे मनोज चव्हाण यांनी सांगितले.
पक्षाला तळागाळापासून अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबवली जात असून, कार्यकर्त्यांचे मत, संघटन क्षमता आणि नेतृत्वगुणांच्या आधारे जिल्हाध्यक्षांची निवड केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी आमदार आसिफ सेठ, माजी आमदार अंजली निंबाळकर, राज्य काँग्रेस युवा विभागाचे सरचिटणीस राहुल जारकिहोळी, काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, सदानंद पाटील, प्रदीप एम. जे., कार्तिक पाटील, मोहन यक्कुंडी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments