Dharwad

धारवाडमधील हेब्बळी येथील दोन सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई

Share

धारवाडच्या विद्याकाशीत आज शिक्षण व्यवस्थाच वेशीवर टांगली गेली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी असताना शिकवायला शिक्षकच नाहीत! प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे निष्पाप विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात असून, हे चित्र संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लाजीरवाणे करणारे आहे.

एकीकडे सरकारी शाळेतील वर्गांमध्ये तुडुंब भरलेली विद्यार्थ्यांची संख्या… दुसरीकडे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जास्त पटसंख्या असतानाही धडपडत शिकवणारे शिक्षक… तर दुसरीकडे शाळेला अतिथी शिक्षक मिळावेत म्हणून बीईओ कार्यालयात निवेदने देऊन देऊन वैतागलेले दोन सरकारी शाळांचे एसडीएमसी सदस्य. आता आम्ही ज्या गावाची कहाणी सांगत आहोत, त्या गावाचा इतिहास दोन ओळींत जाणून घेऊया. हे गाव धारवाड जिल्ह्यात स्वतःचा वेगळा इतिहास राखून आहे. गावात १०१ विहिरी आणि १०१ मंदिरे असल्याचा लौकिक आहे. मात्र, असा इतिहास असणाऱ्या हेब्बळी गावातील दोन सरकारी शाळा सध्या शिक्षकांच्या भीषण टंचाईचा सामना करत आहेत. गावात एक सरकारी आदर्श मुलांची शाळा आणि एक सरकारी आदर्श मुलींची शाळा आहे. प्रथम मुलींच्या शाळेची परिस्थिती पाहिली तर येथे एलकेजी ते ८ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. एकूण पटसंख्या ५२८ आहे. १२ वर्गखोल्या असून १४ शिक्षक आणि एक अतिथी शिक्षक आहे. यात मुख्यध्यापक आणि पीटी शिक्षक वर्ग घेत नाहीत. उर्वरित १२ शिक्षक सध्या ५२८ विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, ज्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत आहे. एकाच वर्गात दोन तुकड्या बसवून शिकवण्याची पाळी शिक्षकांवर आली आहे. याबाबत धारवाड तालुक्याचे क्षेत्र शिक्षण अधिकारी रामकृष्ण सदलगी यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून विनंती करूनही दुर्लक्ष केले जात आहे. मुलींच्या शाळेला तातडीने ५ अतिथी शिक्षक न दिल्यास विद्यार्थी, पालकांसह सर्व एसडीएमसी सदस्यांना आंदोलनाला उतरण्याशिवाय पर्याय नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ही तर मुलींच्या शाळेतील एसडीएमसी सदस्यांची व्यथा झाली, पण याच गावात शताब्दी महोत्सव साजरा केलेल्या सरकारी आदर्श मुलांच्या शाळेची अवस्थाही बिकट आहे. मुलांच्या शाळेत एलकेजी ते ८ वी पर्यंत ४४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सध्या ११ शिक्षक असून, त्यातील एक जण दीर्घ रजेवर आहेत आणि एक जण प्रतिनियुक्तीवर आहेत. म्हणजेच प्रत्यक्षात वर्ग घेण्यासाठी केवळ ८ शिक्षक उपलब्ध आहेत. शारीरिक शिक्षण शिक्षकही या शाळेत नाही. या सर्व अडचणींमध्ये उपलब्ध शिक्षक दोन वर्ग एकाच खोलीत बसवून शिकवत आहेत. क्षेत्र शिक्षण अधिकारी या समस्येकडे काणाडोळा करत आहेत. शिक्षकांची टंचाई दूर करा म्हणून बीईओ कार्यालयाचे खेटे मारून थकलेले एसडीएमसी सदस्य आणि पालक अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

एकंदरीत, धारवाडच्या हेब्बळी गावातील दोन सरकारी शाळांमध्ये विक्रमी पटसंख्या असणे ही एकीकडे अभिमानाची बाब असली, तरी शिक्षकांच्या टंचाईमुळे पालक आणि एसडीएमसी सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारी शाळांमध्ये मुले येत नाहीत म्हणून बोंब मारणारे सरकार आणि अधिकारी, दुसरीकडे शिकायला मुले येत असताना त्यांना शिकवायला शिक्षक देत नाहीत. आता क्षेत्र शिक्षण अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मंजुनाथ डी., इन न्यूज, धारवाड.

Tags: