Belagavi

बेळगावच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात दलित संघटना आक्रमक

Share

बेळगावचे सहाय्यक आयुक्त श्रवणकुमार नाईक यांच्या कथित दलितविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या (आंबेडकरवाद) वतीने आज भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सहाय्यक आयुक्तांच्या बदलीची जोरदार मागणी केली.

आंदोलनादरम्यान सहाय्यक आयुक्तांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी पुतळा जप्त करून बाजूला नेल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

समितीचे राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे यांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. गरीब लोकांच्या फाईल्स प्रलंबित ठेवून कोणतीही नोटीस न देता एकतर्फी आदेश रद्द केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सहाय्यक आयुक्त श्रवण नाईक आणि प्रकाश मेदार या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.

जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार यांनी आरोप केला की, खानापूर तालुक्यातील डोंबारी समाजाच्या हक्काची स्मशानभूमी खाजगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विरोध करणाऱ्या दलितांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या दलितविरोधी अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: