वाढत्या नागरीकरणामुळे बदलत असलेल्या पर्यावरणाच्या काळात बेळगाव तालुक्यातील हंगरगा येथील तरुणांच्या पथकाने पर्यावरण रक्षणाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ‘रॉ फिटनेस’ टीमने गेल्या सहा वर्षांपासून गावात अविरतपणे वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन करून एक प्रकारे हरित क्रांती घडवून आणली आहे.

बेळगाव तालुक्यातील हंगरगा गावात ‘रॉ फिटनेस’ संस्थेचे प्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही वृक्षारोपण मोहीम आता यशस्वीपणे सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. या पर्यावरणपूरक कार्यात तानाजी चौगुले, संदीप हिरोजी, यश चौगुले, युवराज पाटील, भविष्य पटेल, सुनील लाटूरकर, नूतन माळवी, सानिका लाटूरकर, सोमनाथ बिर्जी, मेघन कुगजी, विशाल बिर्जे, कौशल, विनीत हणमशेत आणि अक्षय मुतगेकर यांसह अनेक तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता, त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होईपर्यंत या टीमने दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. या तरुणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हंगरगा गावाला हिरवाईचे कोंदण लाभले असून, स्थानिक नागरिकांकडून या संपूर्ण चमूचे कौतुक होत आहे.


Recent Comments