बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील चिकबुदनूर गावात मोबाईल फोनवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मुरगोड पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली आहे.

चिकबुदनूर गावातील लक्ष्मीदेवी मंदिराच्या आवारात रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फकीरप्पा मल्लप्पा हिडकन्णावर वय ४०, असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मजुरी काम करत होते. फकीरप्पा यांनी त्यांचे मित्र मल्लिकार्जुन सिध्दप्पा पुजारी वय २५, यांचा मोबाईल फोन घेतला होता. याच कारणावरून दोघांमध्ये मंदिराच्या आवारात वाद सुरू झाला.

फकीरप्पा हे लक्ष्मीदेवी मंदिराच्या ओसरीत झोपले असताना आरोपी मल्लिकार्जुन याने तिथे येऊन आपला मोबाईल परत मागितला. मात्र, फकीरप्पा यांनी मोबाईल रात्री देईन असे सांगत नकार दिल्याने दोघांमधील वाद वाढला. यामुळे संतापलेल्या मल्लिकार्जुन याने मंदिराच्या आवारात असलेला जड दगड फकीरप्पा यांच्या डोक्यात घातला. गंभीर दुखापत झाल्याने फकीरप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृत फकीरप्पा यांची पत्नी भारती हिडकन्णावर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मोबाईल फोनच्या किरकोळ वादातून ही घटना घडली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पोलीस कायद्यानुसार पुढील कारवाई करत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
मोबाईल परत देण्याच्या मुदतीवरून झालेल्या वादातूनच ही घटना घडल्याचे मृत युवकाचा भाऊ सिद्धार्थ याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपीसोबत आपला कोणताही वैयक्तिक वाद किंवा पैशांचे व्यवहार नव्हते, असे स्पष्ट करून याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याचे त्याने म्हटले आहे.
आपल्या गल्लीतील रहिवासी रमेश हा या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले. आरोपीने अचानक येऊन पोट, तोंड आणि कानावर दगडाने गंभीर वार केले, ज्यामुळे रस्त्यावरच त्याचा मृत्यू झाला. मृत युवक अविवाहित होता आणि त्याला चार भाऊ आहेत. या प्रकरणात आपल्याला योग्य न्याय आणि भरपाई मिळावी, अशी मागणी कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर भावनाविवश होत केली आहे.


Recent Comments